Latest

*आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी नातेसंबंध दुरावत चालले आहेत : चन्नराज हट्टिहोळी यांची खंत*

बेणकनहळ्ळी (बेळगाव) : आपल्या आयुष्यातील बहुतेक वेळ मुलांच्या भवितव्यासाठी समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनाच्या संध्याकाळी प्रेम, समाधान आणि सन्मान देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी नातेसंबंध दुरावत चालले आहेत, अशी खंत विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांनी व्यक्त केली.

मंगळवारी बेणकनहळ्ळी येथे स्वामी छाया प्रतिष्ठानच्या ‘घरकुल’ वृद्धाश्रमाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.

आपण सामान्यतः आपल्या जीवनातील कर्तृत्व, विकास, संपत्ती आणि यशाबद्दल बोलतो. मात्र, समाजाची खरी श्रीमंती मोजायची असेल, तर तो आपल्या ज्येष्ठ नागरिकांशी किती आदराने वागतो, यावरून ती ठरवली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक ही केवळ आपल्या कुटुंबाची संपत्ती नसून संपूर्ण समाजाची अनुभवसंपदा आहेत. त्यांनी आयुष्यात पाहिलेले चढ-उतार, अनुभवलेली आव्हाने आणि दिलेली जीवनमूल्ये पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात, असे ते म्हणाले.

माझ्या दृष्टीने सेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत करणे नव्हे. ज्येष्ठांसोबत वेळ घालवणे, त्यांचा हात हातात घेणे, त्यांच्याशी चार प्रेमाचे शब्द बोलणे आणि गरजेच्या वेळी त्यांना मदतीचा हात देणे, हीदेखील सेवाच आहे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ज्येष्ठांची गरज आहे. ते आपली अमूल्य संपत्ती आहेत, असे चन्नराज हट्टिहोळी यांनी सांगितले.

घरकुल वृद्धाश्रमाला दरवर्षी आपल्याकडून शक्य ती सेवा देत असतो. ही मदत नसून आपले कर्तव्य आहे, असे मी मानतो. आपण आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. हे ईश्वरी कार्य असून यातून मनाला समाधान मिळते, असे त्यांनी नमूद केले.

2001 मध्ये टिळकवाडीतील एका छोट्याशा भाड्याच्या घरात केवळ तीन ज्येष्ठ नागरिकांसह सुरू झालेली घरकुलची सेवा आज बेणकनहळ्ळीतील विस्तीर्ण परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिकांना आधार देत आहे, ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

ज्येष्ठांची काळजी घेणे हे ओझे नाही, तर आपले संस्कार, कृतज्ञता आणि मानवतेचे प्रतिबिंब आहे. येथे निवास, भोजन, आरोग्यसेवा, वैद्यकीय तपासणी, ध्यानधारणा, फिरणे, मनोरंजन तसेच सण-उत्सव साजरे करण्यासह ज्येष्ठांच्या सुखी व समाधानी जीवनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत घेतली जाणारी काळजी प्रशंसनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठांचा सहवास हीच खरी संपत्ती : सचिन सबनीस

कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्योजक सचिन सबनीस म्हणाले की, घरकुलने 25 वर्षे केलेली सेवा ही छोटी गोष्ट नाही. ज्येष्ठांची सेवा ही ईश्वरसेवेसमान आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्ञानाचा खजिना असून त्यांचे अनुभव आपल्याला जीवनाची दिशा दाखवतात. त्यांना आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसतात. आपण त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा, एवढीच त्यांची अपेक्षा असते.

मात्र, आजच्या तरुणांवर कामाचा ताण आणि अनेक जबाबदाऱ्या असल्याने त्यांना ज्येष्ठांपासून दूर राहण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांना ज्येष्ठांसोबत वेळ घालवता येत नाही, असे त्यांनी सांगितले. घरकुलसोबत गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या आपल्या संबंधांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रौप्यमहोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल पोतदार होते. त्यांनी घरकुलच्या स्थापनेचा प्रारंभ, त्यामागील त्याग आणि गेल्या 25 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला.

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पाठविलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. रौप्यमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

वैष्णवी नाडगौडा यांनी स्वागतगीत सादर केले. स्वामी छाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव पोतदार यांनी घरकुल आश्रमाच्या कार्याची माहिती दिली. शैला चाटे आणि चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. लक्ष्मी पोतदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सचिव एन. बी. देशपांडे यांनी आभार मानले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button